यवतमाळ : कोव्हिड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांना जिभेची तल्लफ भागवण्यासाठी काही दिवसही धीर धरवेना. त्यामुळे त्यांच्या नातलगांनी अक्षरशः जीवाचा आटापिटा केला. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी टरबूज-कलिंगड यासारख्या फळांच्या माध्यमातून खर्रा-तंबाखू पार्सल पाठवण्यात येत होता, तर काही जणांना विदेशी मद्यही पुरवण्यात येत होते. यवतमाळमध्ये सुरु असलेला हा प्रकार रुग्णालय प्रशासनाने हाणून पाडला.
संतापजनक! कोरोना बाधित महिलेसोबत छेडछाड; मेडिकल कोऑर्डिनेटला अटक
तंबाखू आणि विदेशी दारु पार्सल
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोना उपचारासाठी रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी काही रुग्णांना त्यांच्याच नातलगांनी तंबाखू आणि दारु पुरवली. विशेष म्हणजे या गोष्टी पाठवण्यासाठी नातेवाईकांनी भलतीच शक्कल लढवली.
टरबूज फोडून पदार्थांचा पुरवठा
टरबूज फोडून त्याच्या आत खर्रा पार्सल पाठवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर काही नातलगांनी विदेशी मद्यसुद्धा पाठवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शौकिनांची तल्लफ भागवण्याचा रुग्णांच्या नातलगांचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने हाणून पाडला. वैद्यकीय महाविद्यालयात तैनात सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कनेने हा प्रकार उघडकीस आला.
सावध राहा, काळजी घ्या! चिमुरड्यांसाठी कोरोना बनलाय राक्षस; १४ दिवसाच्या मुलाचा घेतला जीव
रुग्णालयाने प्रयत्न हाणून पाडला
कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते रुग्ण उपचार घेतल्यानंतर बऱ्यापैकी धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यानंतर त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातलगांनी हा अजब प्रकार केला. मात्र शौकिनांची तल्लफ डॉक्टर आणि सुरक्षारक्षकांमुळे पूर्ण झाली नाही.