मुंबई : कोरोनाच्या प्रकोपापुढे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बेड उपलब्ध होण्यासाठी कराव्या लागणार्या दगदगीबरोबरच आता ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागल्याच्या हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. राज्यात 15 जणांना प्राण गमवावा लागल्याच्या घटना मंगळवारी समोर आल्या. त्यामध्ये नालासोपार्यात 10, नागपुरात 4 आणि नाशिकमध्ये एका रुग्णाचा समावेश आहे.
नालासोपार्यातील दोन हॉस्पिटलमध्ये दहा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी वेळेत ऑक्सिजन मिळाले नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला. तर नागपूरमध्ये अशाच प्रकारे रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली.
मुंबईत नालासोपारा येथील विनायक हॉस्पिटलमध्ये 7, तर सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये तिघांचा मृत्यू झाला. मात्र, या दोन्ही हॉस्पिटलमध्ये पुरेसा ऑक्सिजनसाठा उपलब्ध असल्याचे वसई-विरार महापालिका आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे. ही बाब वस्तुस्थितीस धरून नसल्याचे त्यात म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर आमदार क्षितिज ठाकूर यांनी ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. या परिसरात सात हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 3,000 रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. तातडीने व्यवस्था झाली नाही, तर मृत्युमुखी पडणार्यांची संख्या वाढू शकते, असे ठाकूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
नागपुरात रुग्णालयात तोडफोड
नागपूर ः नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका कोव्हिड रुग्णालयात ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली. रुग्णालयात एकाचवेळी चार रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची चौकशी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.
कामठी तालुक्यात कांद्री येथील येथील वेस्टर्न कोल्डफिल्ड संचलित (डब्ल्यूसीएल) जवाहरलाल नेहरू रुग्णालयात कोरोनामुळे हे चार रुग्ण मंगळवारी दगावले. मृत्यू झालेल्या चार रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेव्हल 60 ते 70 होती, असे सूत्रांनी सांगितले.
नाशकात महिलेचा मृत्यू
नाशिक : ऑक्सिजन बेड न मिळाल्याने पंचवटीतील एका कोरोनाग्रस्त मातेला घरातच प्राण सोडावा लागला. उषा दिगंबर इंगळे (वय 70, रा. अमृतधाम परिसर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या कोरोना पॉझिटिव्ह होत्या. त्यांना ऑक्सिजन बेड मिळावा, यासाठी त्यांच्या कन्या गायत्री या चार-पाच दिवसांपासून प्रयत्नशील होत्या. अनेकांना फोन करून ऑक्सिजन बेड मिळवून देण्याची विनवणी त्या करीत होत्या. मात्र, त्यांना बेड उपलब्ध झाला नाही.
अंत्यसंस्कारांसाठी मुलीनेच कारमधून आणला आईचा मृतदेह
आईच्या मृत्यूचे दु:ख कमी म्हणून की काय, तब्बल चार तास प्रतीक्षा करूनही अंत्यसंस्कारांसाठी शववाहिकाही मिळाली नाही. शेवटी त्यांच्या कन्येने एकट्याने मातेचा मृतदेह कारमधून स्मशानात आणला. अंत्यसंस्कारांसाठी मृत्यू दाखला आवश्यक असल्याने त्यांनी आधी मेरी येथील कोव्हिड केअर सेंटर गाठले. तेथून मातेचा मृत्यू दाखला घेतला व पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले. नाशिक शहरात दररोज सुमारे दोन ते अडीच हजार रुग्ण आढळून येत असून, रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. त्यातच आता अॅम्ब्युलन्स व शववाहिकाही मिळत नसल्याचे भयावह वास्तव समोर येत आहे.