मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी अचानक लॉकडाऊन केल्याने मजूर आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. यातून राज्य सरकारने धडा घेतल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊन अटळ आहे. तरीही मजूर आणि अन्य लोकांना आपल्या गावी परतण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला जाणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
लोकांना किमान वेळ मिळावा, असे सर्वांचे मत आहे. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतली, असेही ते म्हणाले. राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी जवळपास झाली आहे. लॉकडाऊन नेमके कसे असेल, निर्बंध कसे असतील? काय सवलती असतील? याबाबत मुख्यमंत्री ठाकरे लवकरच घोषणा करणार आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.
राज्यात एक आठवड्याचा लॉकडाऊन न लावता किमान १४ दिवसांचा असावा असे सगळ्याचेच मत आहे. मात्र, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. कामगारांना किंवा घरापासून दूर असलेल्यांना सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी वेळ दिला जाईल. लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी जाऊ देण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे,’ असेही ते म्हणाले.
लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या भूमिकेबाबत वडेट्टीवार म्हणाले, ‘व्यापाऱ्यांनी लोकांच्या जिवाशी खेळू नये. पंतप्रधान मोदी यांनी वर्षभरापूर्वी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली. त्यावेळी अजिबात सवड दिली नाही. त्यावेळी त्यांनी त्यावेळी मुकाट्याने तो निर्णय मान्य केला. त्यावेळी जशी गरज होती, तशी आजही आहे. त्यामुळे संकटाच्या काळात राज्यातील व्यापाऱ्यांनी किंवा कोणीही राजकारण करू नये.’