मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे, याच पार्श्वभूमीवर राज्यात वीकेंड लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, त्याचा म्हणावा असा परिणाम कोरोनाच्या संसर्गावर दिसत नाही. त्यामुळे ठाकरे सरकार संपूर्ण लाॅकडाऊन घेण्याच्या विचारात होतेच. तो निर्णय जवळपास निश्चित झाला, अशी पुष्टी पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.
अस्लम शेख पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रातील परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. मुंबईत जशी जम्बो कोविड सुविधा तयार केली गेली. तशी राज्यात गेल्या. त्या जम्बो कोविड सेंटरमध्ये बेड वाढवण्यात आले. पण, काही लोकांना खासगी रुग्णालयात जायचं असतं, तिथं वेटिंग लिस्ट आहेत. पण आजही शासकीय असो वा महापालिका रुग्णालय असो, तिथे जागा उपलब्ध आहे. तिथे ऑक्सिजनही उपलब्ध आहेत. जम्बो कोविड केंद्रात जास्तीत जास्त बेड हे ऑक्सिजन आणि आयसीयू बेड आहेत. आताची स्थिती बघून आपण नाईट कर्फ्यू लावला. दिवसा जमावबंदी केला. वीकेंड लॉकडाउन करुन बघितला. पण, जितकी रुग्णसंख्या कमी होणं अपेक्षित आहे, तितकी होत नाही. त्यामुळे सरकार सगळ्यांचे सल्ले घेत होते. त्यातून आज गाईडलाईन्स तयार होतील आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल”, असं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं आहे.
“एसओपी (लॉकडाउन गाईडलाईन्स) निश्चित झाल्यानंतर किती दिवसांसाठी लागू केली जाईल, हे सर्वांनाच कळेल. टास्क फोर्समधील काही लोकांचं म्हणणं होतं की, २१ दिवसांचा लॉकडाउन लावावा. काही लोकांचं म्हणणं होतं की, लोकांना त्रास होईल त्यामुळे दोन आठवड्यांचा (१४ दिवसांचा) लावा. तर काहीचं म्हणणं होतं एक आठवडा लावावा. कारण संक्रमणाची साखळी तुटली पाहिजे. त्यामुळे बाकीच्या सुविधा तयार करता येतील. सगळ्यांच्या सूचना घेऊनच निर्णय घेतोय. फक्त अधिकाऱ्यांचंच ऐकायचं असं नाही”, असंही अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.