अकोट (प्रतिनिधी)- दोन दिवसात महाराष्ट्र शासनाकडून एकदम कडक लॉकडाऊन होण्याची माध्यमामध्ये चर्चा असल्यामुळे, अठरा पगाड जनजाती मधील, बारा बलुतेदारासह ,झोपडट्टीतील रोज मजुरी करणाऱ्या जनसामान्यामध्ये, उपासमारीने मरण्याच्या भितीचे वातावरण तयार होत असलेले दिसून येत आहे . १ ) कडक लॉकडाऊन किंवा टाळेबंदी लागले तर सर्वच व्यवसाय ठप्प होतील काय ? २ ) वाहतूक बंद होऊन दळणवळण बंद होईल का ? ३) मजुऱ्या बंद झाल्यास पोटाला खायचे काय ? असे प्रश्न त्यांना भेडसावत आहेत . या लॉकडाऊन मध्ये सधन व्यक्ती, राजकीय पुढारी आणि शासकीय नोकरदार यांना काहीच फरक पडणार नाही . शासकीय कर्मचाऱ्यांना पगारी सुट्या मिळतात . हाल मात्र रोजमजुरी शोधून भाकरेचा चंद्र शोधणाऱ्यांचे होतात . यामध्ये, टेलरकाम करणारे शिंपी, जोडेचपला शिवणारे चांभार, कपडे इस्त्री करणारे धोबी, सलून व्यवसाय करणारे नाभिक, ज्वेलर्स – हॉर्डवेअर – कापड दुकान – जनरल स्टोअर्स वर रोजमजुरी करणारे मजूर, भांडी घासून व कपडे धुवून मजूरी मिळविणाऱ्या मोलकरणी, फळे, टोपल्या, सुप, दुरड्या विकणारे, बॅन्डपथक, पुंगी बाजा वाजवून, गोंधळ जागरण करून उदरनिर्वाह करणारे कलावंत, ऊसाचा ताजा रस, चहाकॉफी, आईस्क्रिम – कुल्फी विकणारे लघु व्यवसायीक, हातगाड्यावर किंवा इतर दुकानांवर हमाली करणारे हमाल इ. सर्वांचेच रोजगाराचे साधन हिरावून घेतल्या गेल्यानंतर त्यांनी जगायचे तरी कसे ? असा प्रश्न गोरगरीब मजूरांना भयग्रस्त करून सोडत आहे . तेव्हा महाराष्ट्र शासन यावर काही उपाय योजना करणार की यांना उपाशी मरण्याकरीता सोडणार असा प्रश्न आजरोजी निर्माण झाला आहे .