Covid19 लंडन
भारतासह जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.’नेझल स्प्रे’द्वारे कोरोना विषाणूचा प्रभाव ९९ टक्के कमी होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण रोखू शकतो. तसेच संसर्ग झालेल्यांचा आजाराचा कालावधी कमी करुन लक्षणांची तीव्रता कमी होत असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
याबाबत कॅनडाची कंपनी सॅनोटाइज रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि ब्रिटनमधील अॅशफोर्ड अॅण्ड पीटर्स हॉस्पिटल्सने क्लिनिकल चाचणी केली आहे. या चाचणीचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले.
Covid19 ब्रिटनमध्ये केलेल्या क्लिनिकल चाचणीत ‘सॅनोटाइज’ या नेझल स्प्रेद्वारे कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे आढळून आले आहे. ‘नेझल स्प्रे’द्वारे २४ तासांत कोरोना विषाणूचा प्रभाव ९५ टक्के आणि ७२ तासांत ९९ टक्के कमी होतो.
‘नेझल स्प्रे’मुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, असे या चाचणीतून निष्पन्न झाले आहे. अगदी कमी वेळेत कोरोनाचा प्रभाव कमी करण्यास आणि संसर्ग झालेल्या रुग्णांमधील लक्षणांची तीव्रता कमी करण्यास यामुळे मदत होऊ शकते. ‘सॅनोटाइज’ श्वसनमार्गाच्या वरच्या भागातील विषाणूला मारुन टाकतो. तसेच फुफ्फुसात संसर्ग पसरु देत नाही. ‘नेझल स्प्रे’ उपचार पद्धत सुरक्षित असून ती प्रभावी आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग अगदी कमी कालावधीत रोखता येतो, , असाही दावा करण्यात आला आहे.