Covid19 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दहावीची परीक्षा जूनमध्ये आणि बारावीची मे अखेर परीक्षा घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
Covid19 ”महाराष्ट्रातील सध्याची कोविड-१९ ची परिस्थिती पाहता आम्ही दहावी आणि बारावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सद्यस्थिती परिक्षांचे आयोजन करण्यास अनुकूल नाही. आपले आरोग्य आमचे प्राधान्य आहे.” असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
आम्ही सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्ड आदींना पत्र लिहून त्यांच्या परिक्षेच्या तारखांवर पुनर्विचार करण्याची विनंती करणार आहोत, असेही गायकवाड यांनी सांगितले.
Covid19 राज्यभरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत शालेय शिक्षण विभाग आणि राज्य मंडळाकडून सर्व स्तरातील घटकांकडून आढावा घेण्यात आला. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी एमपीएससी परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनामुळे वर्षभर विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या. पण शाळांमध्ये ऑनलाईन पध्दतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू होती. दरम्यान, राज्यात पुन्हा कोरोनाची लाट आल्याने विद्यार्थी हित लक्षात घेत शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळांमधील नववी व अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे.