बुलडाणा : वैकुंठधाम स्मशानभूमीत पुरलेल्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा प्रकार बुलडाण्यात समोर आला आहे. मोकाट कुत्रे जमीन उकरुन मृतदेहांचे लचके तोडत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. आपल्या आप्तांचे मृत्यूनंतरचे हाल पाहून जनभावना दुखावल्या जात आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरमधील वैकुंठधाम स्मशानभूमीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
स्मशानभूमीची संरक्षक भिंत पडली
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात नदीकाठावर माता महाकाली वॉर्ड परिसरात वैकुंठधाम स्मशानभूमीची निर्मिती करण्यात आलेली आहे. या स्मशानभूमीची नदी पात्राकडील संरक्षण भिंत गेल्या काही वर्षांपासून पडलेली आहे. त्यामुळे नदी पात्राकडून ही स्मशानभूमी उघडीच आहे.
या स्मशानभूमीमध्ये सर्वधर्मीय व्यक्तींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. अग्नीडाग देणे किंवा मृतदेहाचे दफनही इथे केले जाते. मात्र या ठिकाणी गाडण्यात येणाया मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून होत आहे.
मृतदेह उकरुन कुत्र्यांनी फरफटत नेले
बुलडाणा शहरातील आणि परिसरातील मोकाट कुत्रे हे स्मशानभूमीत जाऊन तिथे दफन केलेले मृतदेह उकरुन काढतात. त्यानंतर ती फरफटत नेण्याचाही प्रकार घडत आहेत. तर काही मृतदेहांचे लचके तोडल्याचा प्रकारही समोर आला आहे. काही मृतदेहांचे सांगाडे परिसरात पडलेले आढळून आल्यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे.
संरक्षक भिंतीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
वैकुंठ स्मशानभूमीत सध्या अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. मात्र या स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. तेव्हा समाज पुढाऱ्यांनी समोर येत या प्रकाराला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि संरक्षण भिंतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून मृतदेहांची अवहेलना थांबवावी, अशी मागणी जनसामान्यांमधून केली जात आहे.
भंडाऱ्यातही कुत्र्यांकडून मृतदेहांची विटंबना
कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा मृतदेह जाळण्यासाठी सरणावर लाकडे कमी पडत आहेत. त्यामुळे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहांचे लचके कुत्रे तोडत असल्याचं नुकतंच भंडारा जिल्ह्यात उघडकीस आलं होतं. कुत्रे हे मांस घेऊन गावात जात असल्यानं भंडाऱ्यातील स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या गावात घबराट पसरली होती. स्मशानभूमी इतरत्र हलवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.