महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्षभरात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या. पण शाळांमध्ये आँनलाईन पध्दतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू होती. दरम्यान राज्यात पुन्हा कोरोनाची लाट आल्याने विद्यार्थी हित लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळांमधील नववी व अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. अशी माहिती राज्य सरकारकडून आज (दि.०७) देण्यात आली आहे.
पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मागील वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत कार्यक्रम आखण्यात येईल. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीकडे शासन विशेष लक्ष देईल. राज्यातील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेईल यासाठी आपण निश्चितच कटिबद्ध राहुया. विद्यार्थ्यांचे आरोग्य व पुढील शैक्षणिक धोरणांचा विचार करूनच शासन शैक्षणिक धोरण अमलात आणेल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
राज्यात शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे इ. पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुरू असल्याने शिक्षकांनी आकारिक मूल्यमापन करीत आहेत. मात्र संकलित मूल्यमापन करता आलेले नाही. या स्थितीत शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधील कोविड १९ ची अपवादात्मक परिस्थिती पाहता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वी घेतला आहे.