मुंबई । मनसुख हिरेन यांच्या आत्महत्येसह,सचिन वाझे प्रकरणी सरकारला अडचणीत आणणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या पोलीस खात्यातील माहिती कशी मिळते याची माहिती राज्याचे नूतन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका गाडीत स्फोटके आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.या घटनेतील मुख्य दुवा असणारे मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याने या प्रकरणाचे गुढ वाढल्याने एका मागून एक अस्त्र सोडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला अडचणीत आणले होते. फडणवीस देत असलेली माहिती आणि पुरावे बघून सत्ताधारी बुचकळ्यात पडले होते.सरकारच्या अगोदर फडणवीस यांच्याकडे एवढी माहिती येते असा प्रश्न उपस्थित झाला होता.आज दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी याबाबत माहिती दिली.देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते.तसेच त्यांच्याकडे गृहखात्याचा पदभार होता. त्यामुळे गृहखात्यातील अधिकारी त्यांच्या संपर्कात असणे स्वाभाविक आहे.त्यामुळेच त्यांना माहिती मिळते असे सांगतानाच आता त्यावरही लक्ष देणार असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
वळसे पाटील यांनी आज मंत्रालयात गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.त्यावेळी ते बोलत होते.सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक आहे. परंतु, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचे काम करेन,असे सांगून, प्रशासकिय कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार मानले. गृहमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडण्याचे काम मी करेल.कोरोनामुळे पोलीस दल रस्त्यावर उतरून काम करीत आहेत.पोलीस दलाचे काम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आहे. तरीही कोरोनामुळे त्यांना कर्तव्य पार पाडावे लागत आहे. एप्रिलमध्ये गुडीपाडवा,रामनवमी, आंबेडकर जयंती,रमजान असे सण येत आहेत. प्रत्येक धर्मीयांच्या दृष्टीने हे सण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी आव्हानात्मक परिस्थिती असणार आहे, असे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले.
पोलीस दलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकारी असल्याचा प्रश्न गृहमंत्री पाटील यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, कुणाच्या निष्ठा काय आहेत, हे तपासण्यात येईल,उच्च न्यायालयाने परमबीर सिंग प्रकरणी जो काल निर्णय दिला आहे. त्याला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच न्यायालयाने जो आदेश दिला आहे,त्याला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू,असेही वळसे पाटील म्हणाले.गृहविभागाकडून महिला आणि सामान्य नागरिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत.त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.यासाठी सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करणार असल्याचे सांगतानाच त्यासाठी आजी माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शक्ती कायदा,पोलीस भरती गतीमान करणे, पोलिसांना घरे देणे या सर्व गोष्टींवर लक्ष देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात जी काही प्रत्येक विभागात कार्यप्रणाली ठरलेली आहे. वेगवेगळयास्तरावर अधिकार दिलेले असतात त्याप्रमाणे निर्णय करण्यात येईल असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. गृहविभाग हा नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. किंवा काटेरी मुकुट म्हणता येईल असाच हा विभाग राहिला आहे. कारण दैनंदिन घटना घडत असतात त्यामधून नवनवीन प्रश्न तयार होतात आणि त्याची सोडवणूक करावी लागते असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. दरम्यान अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.