कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत आहे. या वयोगटाला विषाणूपासून वाचवणे आवश्यक असल्यानेे 25 वर्षापुढील सर्वाना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. मोठ्या संख्येने तरुण वर्ग जो घराबाहेर कामाला जातो, त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
दीड कोटी डोस मिळावेत
4 एप्रिलपर्यंत 76 लाख 86 हजार जणांना लस देण्यात आली आहे. 3 एप्रिल रोजी लस देण्याचा उच्चांक करण्यात आला. लसीकरण वाढविण्यासाठी केंद्राने जादा डोसदेखील द्यावेत, अशी विनंती करून मुख्यमंत्री म्हणतात की, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या 6 जिल्ह्यांसाठी केवळ 3 आठवड्यांत 45 वर्षापुढील सर्वाना लस देण्याची आमची तयारी आहे. याकरिता दीड कोटी डोस मिळावेत, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
शनिवारी निवडक संपादकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला तेव्हा दै. पुढारीचे चेअरमन तथा समूह संपादक योगेश जाधव यांनी ज्या अनेक सूचना केल्या त्यात लसीकरणाबद्दल महत्त्वाची मागणी त्यांनी केली होती. महाराष्ट्रातील 75 टक्के रुग्ण हे चार ते पाच जिल्ह्यांत आहेत. किमान या जिल्ह्यांमध्ये तरी लसीकरणासाठी घातलेली
वय वर्षे 45 ची अट शिथित करावी आणि 18 वर्षांवरील सर्वांना सरसकट लस आपण देऊ शकलो तर कोरोनाला लवकर आवर घालता येऊ शकेल, असे योगेश जाधव म्हणाले होते. आता मुख्यमंत्र्यांनीही 45 वयाची अट 25 वर आणण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.