अमरावती : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी शिवकुमार यांच्या त्रासामुळेच आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्याच्यावर भादंविच्या कलम ३१२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याने दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रासामुळेच दीपालीचा गर्भपात झाल्याचे समोर आले आहे.
दीपाली यांनी आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी लिहून शिवकुमारने दिलेल्या त्रासाबद्दल सविस्तर लिहिले होते. आत्महत्येपूर्वी दीपाली यांनी मेळघाटचे निलंबित क्षेत्र संचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या नावाने चिठ्ठी लिहिली. यात त्यांनी शिवकुमारने दिलेला त्रास आणि त्याच्या वर्तनाबद्दल लिहिले होते. वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून सहकार्य मिळाले नसल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले होते.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दीपाली यांनी अनेक धक्कादायक आरोप केले होते. ऑक्टोबर २०२० मध्ये श्रीनिवास रेड्डी दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत ट्रेक करण्यास शिवकुमारने भाग पाडले. आपल्याला चालण्यास त्रास होत असल्याचे वरिष्ठ अधिकारी पीयूषा जगताप यांना सांगितले होते. तरीही शिवकुमारने दीपाली यांना तीन दिवस चालण्यास भाग पाडले. त्यामुळे दीपाली यांचा गर्भपात झाला. त्यानंतरही रजा दिली नाही, असे चिठ्ठीत लिहिले होते. याआधारे शिवकुमारविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील करीत आहेत. त्यांनी दीपाली यांचा औषधोपचाराची कागदपत्रे गोळा करून साक्षीदारांचा जबाब नोंदवला आहे. त्यातून शिवकुमारमुळेच दीपालीचा गर्भपात झाला, शिवाय त्याने दिलेल्या शारिरीक आणि मानसिक त्रासामुळेच दीपाली यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे.