मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजागी दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अशी दिलीप वळसे पाटील यांची ओळख आहे. सध्या दिलीप वळसे पाटील उत्पादनशुल्क आणि कामगार खात्याचे मंत्री आहेत. गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांमधील गटबाजी संपवण्याचे त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असणार आहे.
दीडवर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारची स्थापना होत असताना, जयंत पाटील यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील यांचे नाव गृहमंत्रीपदासाठी आघाडीवर होते. अनिल देशमुख या पदाच्या शर्यतीतच नव्हते. पण प्रकृतीच्या कारणास्तव वळसे-पाटील यांनी गृहमंत्री बनण्याची संधी नाकारली. जयंत पाटील यांनी सुद्धा हे पद नाकारले होते. अखेर शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. देशमुखांमुळे विदर्भात पक्ष विस्तार होईल, असा त्यामागे उद्देश होता. गृहविभाग हाताळतान काय-काय जबाबदाऱ्या असतात, आव्हाने असतात याबद्दल शरद पवारांनी देशमुखांशी चर्चा केली होती, त्यानंतर हे पद त्यांच्याकडे सोपवले होते.
कसा आहे प्रवास
शरद पवारांचे राजकीय सहाय्यक म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. १९९० साली पुण्याच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. सलग सहावेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. १९९९ साली शरद पवारांसोबत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. १९९९ ते २००९ या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात ते मंत्रिपदावर होते. वैद्यकीय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण, आर्थिक नियोजन आणि ऊर्जा अशी महत्त्वाची खाती त्यांनी संभाळली आहेत. नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१४ पर्यंत ते विधानसभेचे अध्यक्ष होते.