दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बने अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना हादरा दिला असून मुंबई होयकोर्टाच्या एका आदेशानंतर देशमुख यांनी स्वत:हून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून ही जबाबदारी सोपवण्यासाठी नव्या नेत्याची चाचपणी सुरू झाली आहे. यात शरद पवार यांचे विश्वासू व निष्ठावंत नेते आणि विद्यमान उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती हाती येत आहे.
वाचा: अनिल देशमुख यांचा गृहमंंत्रिपदाचा राजीनामा; नैतिकतेचं दिलं कारण
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा दावा परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केला होता. याप्रकरणी अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना गृहमंत्री देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करावी, असे आदेश आज मुंबई हायकोर्टाने दिले. त्यानंतर काही वेळातच अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोपवतानाच तो ट्वीटरवरही पोस्ट केला आहे. हायकोर्टाने सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिल्याने गृहमंत्री या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून या पदावरून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. मला आपण कायमुक्त करावे, अशी विनंती देशमुख यांनी राजीनामापत्रात केली आहे.
वाचा: ‘मी आमच्या पक्षाचा एजंट, पवार साहेबांवर टीका केल्यानंतर गप्प बसू का?’
देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून त्यांची जागा आता कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा असून शरद पवार वळसेंवर ही जबाबदारी सोपवणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वळसे यांच्या नावावर एकमत झाले असून त्यांच्याकडील उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्याकडे दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
वाचा: फडणवीस काय करू शकतात हे जगाला दाखवून द्या; शिवसैनिकाची पोस्ट व्हायरल
दरम्यान, दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातवेळा विधानसभेवर निवडून गेले असून विधिमंडळाच्या कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळली आहे. कधीकाळी शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले दिलीप वळसे सध्या राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. सध्या उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री असलेले वळसे यांनी वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा या खात्यांचे मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.