मुंबई : पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असं ट्विट देशमुख यांनी केले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांचा राजीनामा तात्काळ मंजूर केला.
गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे व अन्य एका अधिकाऱ्यांना महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. दरम्यान, सिंह यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाज ठोठावला, पण त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगीतले. यानंतर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली. अॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली. आज (दि. ५) या प्रकरणासह आणखी तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला.
ॲड. जयश्री पाटील कोण आहेत??
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यानंतर या प्रकरणी अॅड जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल केली. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रूपये वसुलीचा आरोपाच्या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत सेंट्रल ब्युरो ऑफ इनवेस्टीगेशन (सीबीआय) ने चौकशी करावी, अशी मागणी अॅड जयश्री पाटील यांनी रिट केली होती.
दरम्यान, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश देतानाच संपुर्ण प्रकरणात १५ दिवसांचा अहवाल सादर करण्याचेही स्पष्ट केले आहे. अनिल देशमुख्य गृहमंत्री असल्याने त्यांच्या अखत्यारीत महाराष्ट्र पोलिस आहेत, म्हणूनच या प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे होऊ शकत नाही. उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीमुळे आज मी खूप खूशा आहे, असे अॅड जयश्री पाटील म्हणाल्या. या प्रकरणात जयश्री पाटील यांनाही बोलावण्यात येणार आहे. अनिल देशमुख तुम्ही कितीही दबाव आणला तरीही कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा तुम्ही मोठे नाहीत, अशी प्रतिक्रिया अॅड जयश्री पाटील यांनी दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालायने अॅड जयश्री पाटील यांची याचिका दाखल करून घेताना म्हटले की, या प्रकरणात डायरेक्टर जनरल सीबीआय या प्रकरणात चौकशी करतील. त्याचवेळी कोर्टाकडून अॅड जयश्री पाटील यांचे कौतुकही केले. कोणीतरी एक शूर आहे ज्याने हिंमत दाखवली अशा शब्दात हायकोर्टाने त्यांचे कौतुक केले. एवढ्या १०० कोटींच्या प्रकरणात एक तरी शूर आहेत जे समोर आले आहेत, असे मत कोर्टाने यावेळी व्यक्त केले.
सध्या मराठा आरक्षणाला विरोध करणा-या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्या याचिकाकर्त्यांपैकी एक म्हणजे अॅड. जयश्री पाटील होय. अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच्या मराठा आरक्षणविरोधातील याचिकाकर्त्या म्हणून त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे. जयश्री पाटील यांनीही सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध जाहीर केला आहे. अॅड. सदावर्ते यांच्या अॅड. जयश्री पाटील या पत्नी आहेत. दोघांनी मिळूनच मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
ॲड. जयश्री पाटील या जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या मानव हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्षे काम पाहिले आहे. तसेच मानव अधिकारांबाबत त्यांच्या नावे अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची कायदा विषयात डॉक्टरेट झाली आहे. गेल्या २२ वर्षापासून त्या मुंबई हायकोर्टात ॲडव्होकेट म्हणून कार्यरत आहेत. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.