मुंबई: पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनिल देशमुख यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या पदाचा व घराण्याचा मान राखत कारवाई करावी, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह काही मोठे नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.
नैतिकतेतून राजीनामा
सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.