मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लॉकडाउन लावला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे परप्रांतीय धास्तावल्याचं चित्र आहे. त्यामुळे परराज्यात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. दररोज रेल्वे स्थानकावरून ६० टक्केच्या क्षमतेने रेल्वे गाड्या धावत आहेत. मुंबईच्या प्रमुख रेल्वे स्थानकामध्ये दररोज ५० रेल्वे गाडया बाहेर राज्यात जातात . लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दररोज २० गाड्या इतर राज्यात जातात.
सरासरी दररोज जाणाऱ्या प्रवाशांची संख्या २५ हजार असून यांपैकी फक्त मुंबईतून जाणाऱ्यांची संख्या १५ हजाराच्या घरात पोहचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतात परप्रांतीय मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील वर्षाप्रमाणे स्थिती ओढवू नये म्हणून आधीच गावी पोहचण्यासाठी ही परप्रांतीय मजुरांची धडपड आहे.
२०२० मध्ये कोरोनाचा मुंबईत शिरकाव झाल्या नंतर टाळेबंदी करण्यात आली, त्यानंतर मिळेल त्या मार्गाने, वाहनाने परप्रांतीय मजूर गावी जायला निघाले होते. काही तर पर्याय नसल्याने चालत निघाले आणि आता पुन्हा तीच स्थिती निर्माण होण्याच्या भीतीपोटी आधीच हे सगळे परप्रांतीय आपल्या गावी जायला निघाले आहेत .