अकोला(प्रतिनिधी)– ज्या कोविड रुग्णांच्या घरी स्वतंत्र राहण्याची सुविधा आहे, अशा रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अशा रुग्णांनी स्वतःच्या ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले आहे. सकाळी सहा मिनिटे खोलीतच चालावे ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी आल्यास तात्काळ रुग्णालयात भरती व्हावे, असा वैद्यकीय सल्ला डॉ. चव्हाण यांनी दिला आहे.
गृह अलगीकरणातील रुग्णांना औषधोपचार घ्यावयाचा असतो. तसेच पूर्ण विश्रांती घ्यावयाची असते. या रुग्णांनी उपचार काळात घरातील एका खोलीत रहावयाचे असते. घरातील अन्य व्यक्तिंना कुठेही संपर्क होणार नाही याची काळजी स्वतः रुग्णाने व घरातील अन्य व्यक्तिंनीही घेणे आवश्यक आहे. आपल्या घरातील व्यक्तीला कोविड संसर्ग झालाय ही बाब शेजाऱ्या पाजाऱ्यांपासून लपवू नका. त्यांना ही बाब माहिती झाल्यास ते आपल्या संपर्कात येणार नाही व संसर्गाची पातळी आपोआप कमी होईल. कोविड पॉझिटीव्ह रुग्णाने सकस आहार घेऊन आराम करावा. मन प्रसन्न राहण्यासाठी चांगली पुस्तके वाचणे, संगित ऐकणे, शरीराला झेपेल इतपत माफक व्यायाम करणे, ध्यान करणे आदी गोष्टी कराव्या. प्रत्येक रुग्णाने दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी अशी तीन वेळा आपली स्वतःची ऑक्सिजन पातळी पल्स ऑक्सिमिटरने मोजावी. सकाळी खोलीतल्या खोलीत सहा मिनिटे चालावे नंतर पातळी मोजावी, ती ९४ पेक्षा कमी आल्यास तात्काळ रुग्णालयात भरती व्हावे,असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले आहे.