अकोला(प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोविड संसर्गाचा प्रतिरोध करण्यासाठी कोविड पॉझिटीव्ह व्यक्तीच्या निकट व दूरस्थ संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या प्राधान्याने कराव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे प्रशासकीय यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरस्निं ग द्वारे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेशी संवाद साधला व आढावा घेतला. या आढावा बैठकीस जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार,विश्वनाथ घुगे, जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे यांचा सहभाग होता. तसेच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी निर्देश दिले की, येत्या तीन दिवसांत सुट्यांच्या कालावधीत नियोजन करुन अधिकाधिक लोकांच्या चाचण्या कराव्या. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची संपर्क साखळी तपासून त्यातील व्यक्तींच्या चाचण्या ह्या प्राधान्याने कराव्या. जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या आठवडी बाजारात दुकाने लावणाऱ्या व्यापारी व त्यांच्याकडील कामगारांनीही कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. बाजारात दुकान लावतांना कोविड निगेटीव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालये, दवाखाने येथे तपासणीसाठी व कोविड लक्षणांसारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवा. त्यासाठी पथके गठीत करा. याबाबत जनजागृतीही करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.