आकोट : येथे एका अल्पवयीन मुलाची भीषण हत्या करण्यात आली होती.या प्रकरणात तत्कालीन तपास अधिकारी असलेले पोलिस उपअधीक्षक सुनील सोनवणे हे साक्षीसाठी येथील न्यायालयात हजर राहत नसल्याने त्यांना वॉरंट बजावण्यात आला आहे आणि येथील कल्पतरू विद्यामंदिराचे मुख्याध्यापकांना न्यायालयात साक्षीसाठी हजर होण्याकरिता समन्स बजावण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील सुनावणी शनिवार 2 एप्रिल रोजी होणार आहे.
येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी हे समन्स जारी केले आहेत.हा खटला जलदगतीने पूर्ण करण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. आकोट येथील अल्पवयीन मुलगा कृष्णा गणेश जांभेकर या 7 वर्षीय मुलाचा मृत्यू अनैसर्गिकरीत्या झाल्याचे,त्या मुलाच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.विशेष म्हणजे या हत्या प्रकरणात पोलिस सोडून सर्व साक्षीदार सरकार पक्षाला फितूर झाले आहेत.या सर्व साक्षीदारांचे बयाण फौजदारी प्रक्रियेच्या कलम 164 प्रमाणे प्रथमश्रेणी न्यायालय आकोट येथे नोंदविण्यात आल्यावरही हे सर्व साक्षीदार फितूर झाले आहेत.
या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी जे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले त्यात कल्पतरू विद्यामंदिरचे मुख्याध्यापक यांचे नाव साक्षीदार म्हणून दर्शविले नव्हते.या प्रकरणात त्यांचीही साक्ष महत्वाची असून फौजदारी प्रक्रि येच्या कलम 311 प्रमाणे मुख्याध्यापकांनी मृतक कृष्णा गणेश जांभेकर याची जन्मतारीख व इतर सर्व कागदपत्रे घेवून न्यायालयात साक्ष देण्यास बोलवावे असा युक्तिवाद सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला.
शिवाय तत्कालीन तपास अधिकारी सोनवणे यांना समन्स बजावूनही ते साक्षीस न्यायालयात येत नाहीत म्हणून तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे विरूद्ध जमानती वॉरंट काढावा अशी विनंती अजित देशमुख यांनी न्यायलयाला केली असता या प्रकरणी सर्व बाजू ऐेकून न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी त्यांचे दोन्ही अर्ज मंजूर केले आहेत. विशेष म्हणजे या खून प्रकरणात जे साक्षीदार सरकार पक्षाला फितूर झाले आहेत त्यांच्या विरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असेही सरकारी वकील अजित देशमुख यांनी सांगितले आहे.