शिरपूर (जि.वाशीम) : भावाला नोकरी लावून देतो, असे आमिष देऊन वाशीम तालुक्यातील सुकळी येथील संगीता चव्हाण या महिलेस आरोपी गोवर्धन येथील ज्ञानेश्वर काशीराव वाघ याने दीड लाख रुपयाने गंडवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून त्या आरोपीविरुद्ध शिरपूर पोलिस स्टेशन येथे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता दिनेश चव्हाण रा.सुकळी, तालुका वाशीम येथील महिलेचा भाऊ शरद देवराव पवार रा.मादनी तालुका मेहकर यास नोकरी लावून देण्यासाठी शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोवर्धन येथील उद्धव सदाशिव तहकीक यांच्या मध्यस्थीने आरोपी ज्ञानेश्वर काशीराव वाघ रा. गोवर्धन याने कृषी विभागात नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून फिर्यादी कडून सन-२०१९ मध्ये वाशीम-अकोला नाका येथे दीड लाख रूपये घेतले होते.
मात्र, तीन वर्षाचा कालावधी होऊनही सदर आरोपीने ना नोकरी लावून दिली, ना पैसे परत केल्यामुळे फिर्यादीने मध्यस्तीला घेऊन पुणे येथे आरोपी ज्या ठिकाणी राहत होता तिथे गेले असता, काही दिवसात मी पैसे परत करू असे आरोपीने सांगितले नंतर, ता. २८ मार्च रोजी आरोपीने फोन करून आपल्या गावी घरी गोवर्धन येथे बोलविले.
सदर मध्यस्ती व फिर्यादी ता.२८ मार्च रोजी गोवर्धन बस स्थानकावर गेले असता, फिर्यादीने नोकरी लावून देण्यासाठी दिलेले दीड लाख रूपये मागितल्याने आरोपीने अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून पुन्हा पैसे मागीतले, तर जिवाने मारून टाकण्याची धमकी दिली. फिर्यादीने शिरपूर पोलिस स्टेशन गाठून झालेल्या प्रकरणाबाबत सोमवारी (ता.२९) फिर्याद दिली.
सदरच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी भादवि कलम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील वानखडे करीत आहेत.