नवी दिल्ली : पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यावरून एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. तुम्ही जर पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर चिंता करू नका. कारण पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता ३० जून, २०२१ पर्यंत तुम्ही पॅन कार्ड आधारला लिंक करू शकता.
पॅन कार्ड आणि आधार कार्ड परस्परांशी लिंकिंगसाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत बुधवारी (३१ मार्च) संपत होती. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर आर्थिक व्यवहार अडचणीत येण्यासह मोठ्या दंडाला सामोरे जावे लागणार होते. दरम्यान, आज अचानक आयकर विभागाच्या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणावर लोक लिंक करण्यासाठी आले. परिणामी आयकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे ही प्रक्रीया रखडली. ३१ मार्चपर्यंत जर पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसते, तर उद्यापासून १००० रूपयाचा दंड होणार होता. मात्र सर्व्हरच डाऊन झाल्याने अनेकांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यानंतर आता केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे.