मध्य प्रदेशमधील अलीराजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर ग्रामस्थांनी पीडितेला बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबत दोरीने बांधले आणि गावभर मिरवणूक काढली. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी हा जवळचा नातेवाईक आहे.
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकाराचे ‘अमानुष’ असे वर्णन केले आणि आम्ही येथे कसे पोहोचलो अशी विचारणा केली. उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
उर्मिला मातोंडकर ट्विटमध्ये म्हणतात, हे माझ्या हैराणी पलीकडचे आहे. मध्य प्रदेशातील बलात्कार पीडिताला आरोपीसोबत बांधले गेले आणि ‘भारत माता की जय’ अशी घोषणा केली जात आहे. गावभर फिरवले जाते. आम्ही इथपर्यंत कसे पोहोचलो आहोत. अमानुषपणा वेगळ्या स्तरावर आहे. या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अलीराजपूर जिल्ह्यातील गावात रविवारी एका २१ वर्षीय तरुणाने १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. हे कळताच पीडितेच्या कुटूंबाने पीडिता आणि आरोपी दोघांनाही दोरीने बांधून मारहाण केली. त्यानंतर गावभर मिरवणूक काढून त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. या प्रकरणात बलात्काराच्या आरोपीसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.