जळगाव : गेल्या वर्षभरापासून शाळा, कॉलेजेस बंद आहेत. आता दहावीच्या आणि बारावीच्या परिक्षा तोंडावर आल्या आहेत. वर्षभर लिखाणाचा फारसा सराव न केल्याने ऑनलाईनच्या नादात आता मुलांचे हस्ताक्षर बिघडले आहे. आणि त्यांच्या लेखनाची गतीही कमी झाली आहे. त्यामुळे नियोजीत वेळेत ही मुले पेपर लिहु शकतील का , असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या ऑनलाईन शाळा होत आहेत. त्यात काही परिक्षांमध्ये बहुपर्यायी प्रश्नोत्तरांचा मार्ग स्वीकारला गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची लेखनाची सवय मोडली आहे. ऑनलाईन वर्ग होत असल्याने मुले फारशी लिहीत नाही. ते देखील आता ऑनलाईनच अभ्यास करत आहे. पुर्वी वर्गात मुले लिहीत असत आणि नंतर घरी आल्यावर देखील मुले गृहपाठ वहीत लिहून काढत आता असे होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या हस्ताक्षरावर झाला आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात
हस्ताक्षर चांगले व्हावे, यासाठी मुलांनी सातत्याने सराव करावा. तसेच चांगल्या पद्धतीचा पेन वापरावा, फार बारीक पेन वापरु नये. त्यामुळे लेखन कौशल्यावर परिणाम होतो.
– चंद्रकांत भंडारी, शिक्षणतज्ज्ञ
हस्ताक्षर सुधारावे, यासाठी मुलांनी सराव करावा, तसेच लिपीतील तीन प्रमुख चिन्हांचा सातत्याने सराव करावा, कारण लेखन केल्यास ते थेट मेंदुपर्यंत पोहचते. त्यामुळे मुलांचा विकास होतो.
– किशोर कुलकर्णी, सुंदर हस्ताक्षर कार्यकर्ता व तज्ज्ञ
विद्यार्थ्यांनो हे करा
१) प्रत्येक वर्णमालेतील लिपी वेगळी असते. ती ज्या चिन्हांनी तयार झाली आहे. ती मुख्य तीन चिन्हे आहेत. रेषा, वर्तुळ, अर्धवर्तुळ याच्यासहाय्याने कुठलीही लिपी बनली आहे. देवनागरी, संस्कृत या चिन्हानीच बनली आहे. या चिन्हांचा सराव केला. आणि काही अक्षरे काढण्याचे नियम लावले. दररोज सराव केला. तर अक्षरांंना सुंदर वळण लावता येईल.
२) लॉकडाऊनच्या काळात सकारात्मक गोष्टींचा सराव करावा. त्याने लिहण्याचा सराव होईल. आणि अक्षर चांगले होईल.
पालक काय म्हणतात
गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन शाळेमुळे मुलांची लिहण्याची सवय मोडली आहे. त्यामुळे मुलांचे हस्ताक्षर देखील बिघडले आहे. त्यांना सातत्याने लिहण्याची सवय असावी, आणि त्यातून त्यांचा अभ्यास व्हावा, असे शिक्षण शाळेने देणे गरजेचे आहे
– राहुल पाटील.
शाळेत असताना मुले दररोज काही पाने लिहीत होती. मात्र आता ऑनलाईन शाळा झाल्याने ही मुले फारसे लिहीत नाहीत. त्यामुळे त्यांचे शिक्षण देखील अपुर्ण होते. त्यांना लिहिण्याची सवय लागावी. यासाठी त्यांना स्वतंत्र गृहपाठ दिले पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या लिहण्याची गती देखील वाढेल आणि हस्ताक्षर देखील सुधारेल