अमरावती : मेळघाटातील हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दीपाली चव्हाण (वय 32) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. हरिसाल येथील सरकारी घरामध्ये ही घटना गुरूवारी (25 मार्च) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. चव्हाण यांच्या जवळ सुसाईड नोट पोलिसांना मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे.
दीपाली चव्हाण ह्या सातारा जिल्ह्यातील दापोली येथील रहिवासी आहेत. त्यांची मेळघाटात लेडी सिंघम म्हणून ओळख होती. मेळघाट येथील हरिसाल येथे गत तीन वर्षांपासून आरएफओ म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, या प्रकरणी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे (शहा) यांनी राज्याचे प्रधान मुख्य वनसरंक्षक (वन्यजीव) यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी या पत्रातून दिपाली चव्हाण यांच्या मृत्यूविषयी धक्कादायके खुलासे केले आहेत.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे भाटे यांनी म्हटले आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची घटना उघड झाल्यानंतर तब्बल दीड तास कोणालाच घरात प्रवेश करु देण्यात न आल्याने उलटसुलट चर्चा सुरु होती. चव्हाण गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाही. दीपालीला एका उच्चपदस्थ वन अधिकारी म्हणजेच उपवनसंरक्षक (मेळघाट व्याघ्र प्रकल्प) विनोद शिवकुमार हे नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. मृत्यूपूर्वी दीपाली यांनी चार पाणी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. सदर सुसाईड नोटमध्येही उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या वाईट वागणुकीविषयी विस्तृतपणे लिहिले आहे. सुसाईड नोट वाचली असता तर इतर काही वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी हे शिवकुमार यांना पाठीशी घालत आहेत असे समजते. या प्रकरणी मी आपणास पुरावा देऊ शकतो, असा खुलासा भाटे यांनी पत्रातून केला आहे.
दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणी उपवनसंरक्षक विनोज शिवकुमार यांना पदावरुन निलंबित करावे आणि उच्चस्तरीय निपक्ष चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.