मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोव्हिड रुग्णालयातील 6 जणांचा मृत्यू आतापर्यंत झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान हा मॉल शापित मॉल असल्याचे देखील बोलले जात आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी मॉलचा सर्व्हे झाला होता. यात 29 मॉलमध्ये फायर यंत्रणा योग्य नसल्याचं समोर आलं होतं. यात भांडुप येथील या ड्रीम मॉलचा समावेश होता. पालिकेने या मॉलला सुद्धा नोटीस बजावली होती, अशी माहिती आहे.
मृतकांची संख्या 6 वर पोहोचली
भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील सनराइज हॉस्पिटलला लागलेल्या आगीतील मृतांची संख्या 6 वर पोहोचली आहे. आगीच्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
मॉल शापित प्रॉपर्टी
दरम्यान हा मॉल शापित प्रॉपर्टी आहे. निर्माण झाल्यापासून तो कधीच सुरू झाला नाही. एचडीआयएल ने तो बांधला आहे. आशियातील सर्वात मोठा मॉल होता. पण केसेस सुरू झाल्या आणि तो सुरूच झाला नाही. 10 ते 15 वर्ष मॉल असाच रिकामा आहे, त्यात मल्टिप्लेक्स फक्त सुरू आहे, त्यात हे हॉस्पिटल कसे सुरू झाले हा पण प्रश्न आहे. सगळ्यात जास्त अनधिकृत धंदे करणारी कार्यालयंही याच मॉलमध्ये आहेत, असं सांगितलं जात आहे.
हा मॉल म्हणजे घोटाळ्याचा महाल
भाजप नेते कीरीट सोमय्या यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर बोलताना ते म्हणाले की, हा मॉल म्हणजे घोटाळ्याचा महाल आहे. Hdil ने हा मॉल बांधला. या हॉस्पिटलला ओसी नाही, अग्निशामक यंत्रणा नाही. आज इथे मृतकांची संख्या 2 आकडी होऊ शकते. यासाठी या मॉलच्या मालकाला जबाबदार धरलं पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.