मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास तत्काळ थांबवण्याचे आदेश ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला दिले आहेत. तपास थांबवून हत्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सोपवण्यात यावीत, असेही कोर्टाने आदेशात म्हटले आहे.
‘मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे दिला आहे. तशी अधिसूचना यापूर्वीच काढण्यात आली आहे. तरीही एटीएसने तपास सुरू ठेवला आहे आणि आरोपींची कोठडीही मिळवत आहे. त्यामुळे हा तपास तत्काळ थांबवून कागदपत्रे आमच्याकडे देण्याचा आदेश द्यावा’, अशा विनंतीचा अर्ज एनआयएतर्फे करण्यात आला होता. त्यावर कोर्टाने हा आदेश दिला.
२५ फेब्रवारी रोजी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर जिलेटिनच्या कांड्या असलेली एक स्कॉर्पियो कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांची असल्याचे स्पष्ट झाले हो. ५ मार्च रोजी हिरेन यांचा मृतदेह खाडीत सापडला होता. जिलेटिन कांड्यांनी भरलेली कार सापडल्यानंतर त्याचा तपास एनआयए करत होती. तसेच हत्या प्रकरणाचा तपासही एटीएस करत होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयएकडे दिला होता. तरीही एटीएस आपल्या पद्धतीने तपास करत होती. एनआयएच्या कोर्टात अर्ज करून सचिन वाझे यांचा ताबा मागितला होता. हा तपास एनआयएकडे दिला तरी एटीएसकडून काढून घ्या असे म्हटले नसल्याने एटीएस अजूनही या प्रकरणाचा तपास करत होते.