नांदेड: २० जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यात शेत मालकाच्या ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मजूर आरोपीला अवघ्या ६४ दिवसांत भोकर न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्याचा निकाल दिला आहे. याचबरोबर अशी दुर्घटना दुर्मिळ असल्याचे मतही न्यायालयाने नोंद केले आहे.
३५ वर्षीय मजूर आरोपी बाबू संगेराव या मुलीच्या शेतातच सालगडी म्हणून काम करत होता. २० जानेवारी दिवशी दुपारी ४ वाजता बाबूने मुलीला घरी नेण्याच्या बहाण्याने शेतातून घेऊन गेला. मात्रस पाच वर्षांच्या मुलीला घरी घेऊन न जाता शेतातच बाजुला असणाऱ्या झुडुपात मुलीला घेऊन अत्याचार केला. घटनेची माहिती कळू नये म्हणून बाबूने तिची हत्या केली.
खूप वेळा झाला म्हणून मुलीची शोधाशोध सुरू केली. तर रात्री मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर लगेचच आरोपी बाबूही अर्धनग्न अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आला. गावकऱ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तेवढ्यात घटनास्थळी पोलिस दाखल झाल्याने आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी केवळ १९ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
फक्त ४० दिवसांत भोकर न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून आरोपी बाबू संगेरावला फाशीची शिक्षा सुनावली. या खटल्यामध्ये एकूण १५ साक्षीदार तपासले. तसेच तपासामध्ये मुलीच्या अंगावर ४७ जखमा दिसून आल्या. त्यामुळे न्यायालयाने ही घटना दुर्मिळ असल्याचे सांगत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निकालावर गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं.