नवी दिल्ली : एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. कोरोनाची लस उपलब्ध असून त्याची चिंता करण्याची गरज नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. लसीकरणाबाबत केद्राच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता देशभरात सुरू झालेल्या कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.
कॅबिनेट बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशातील ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना एक एप्रिलपासून कोरोनावरील लस दिली जाईल. या लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांनी आपल्या नावांची नोंदणी करावी, असे आवाहन जावडेकर यांनी केले. तसेच भारताकडे कोरोना लसीचा पुरेसा साठा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, केंद्र सरकारने १ मार्चपासून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरण सुरू केले होते. १ मार्चपासून देशातील ६० वर्षांवरील नागरिकांना आणि गंभीर समस्यांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, आता ४५ वर्षांवरील नागरिकांना सरसकट लस देण्यात येणार आहे.