महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा 2020 राज्यातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात हा परीक्षा होत आहे. कोरोना काळात ही परीक्षा होत असल्यानं विद्यार्थ्यांसह आयोगासाठी परीक्षा सुरळीतपणे पार पाडणं हे देखील परीक्षेपेक्षा कमी नाही.
ओळखपत्र जवळ ठेवण्याचं आवाहन
नागपूर पोलिसांनी एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना आयकार्ड सोबत ठेवण्याचं आवाहन केलं आहे. शहरात कोरोनामुळे कडक निर्बंध घालण्यात आले असल्यानं ठिकठिकाणी चेकिंग केलं जात आहे. ओळखपत्र आणि परीक्षेचे हॉलतिकीट दाखवल्यास विध्यार्थ्यांना आणि पालकांना सोडण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कुठलीही चिंता न करता आपल्या परिक्षेकडे लक्ष द्यावे, असं आवाहन झोन 2 डीसीपी विनिता साहू यांनी केलं आहे.
अकोल्यात 18 केंद्रांवर परीक्षा 4977 विद्यार्थी देणार परीक्षा….!
अकोला शहरातील 18 केंद्रावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा आज घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील 4 हजार 977 परीक्षार्थी एमपीएससी’ची परीक्षा देणार आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत परिक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
नंदुरबारमध्ये 6 केंद्रांवर परीक्षा
एमपीएससीची पूर्व परीक्षेसाठी नंदुरबार शहरातील सहा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरसोय होऊ नये शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी 144 कलम लावलं आहे. परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटरच्या परिसरामध्ये परीक्षार्थी सोडून इतरांना प्रवेश दिला जाणार नाही.
पुण्यात सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे
पुण्यात एमपीएससी परीक्षेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 77 परीक्षा केंद्रांवर सुमारे 31 हजार उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर नेमलेल्या सुमारे 2 हजार 700 कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या आरटीपीसीआय चाचण्या करण्यात आल्या आहेत. अहवालामध्ये सुमारे 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. परीक्षा केंद्रांवर कर्मचा-यांची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक केंद्रावर तीन अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्गामध्ये कमीत कमी 12आणि जास्तीत जास्त 24 उमेदवार असतील.
परीक्षेसाठी येणा-या प्रत्येक उमेदवाराचे तापमान तपासणी केली जाणार आहे. आयोगाने नियुक्त केलेल्या खासगी एजन्सीकडून तीन वेळा परीक्षा केंद्राचे सॅनिटायझेशन केले जाईल. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत.
आयोगाकडून कोरोना संदर्भात नियमांचं पालन करण्याचं आवाहन
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरीता आयोगाकडून कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. कार्यप्रणाली प्रमाणे उमेदवारांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना किमान तीन पदरी कापडाचा मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. आयोगाडकून परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्राकरीता करणे अनिवार्य आहे.