सिंदखेडराजा (बुलडाणा) : तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गहू, हरभरा, कांद्याचे मोठे नुकसान झाले. हवामान विभागाने आणखी काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली असून नुकसानीचा सर्व्हे करावा, अशी मागणी सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी करीत आहे.
तालुक्यातील शेंदुर्जन महसूल मंडळांमध्ये कांदे, गहू, हरभरा पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी शेतकर्यांच्या शेतातील पीक चांगले आले होते. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु सध्या अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतकर्यांचे पिके शेतात उभे आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. काही ठिकाणी गहू शेतात उभा आहे तर हरभर्याची काढणी करून एका ठिकाणी गंजी करून ठेवण्यात आले आहे. वारा जास्त प्रमाणात असल्याने सुद्धा हरभरा उडून केला आहे. तर काही ठिकाणी पावसाने भिजला आहे. शेकडो एकर मधील उभा असलेला कांदा जमीन दोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासनाने पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.