बुलडाणा : सहाव्या वेतन आयोगातील मार्गदर्शक तत्त्वांना डावलत प्रशासनाची दिशाभूल करून नियमबाह्य वेतनवाढ घेतल्याचा प्रकार येथील नगरपालिकेत घडला होता. शासनाला लाखो रुपयांनी लुबाडणार्या नगरपालिकेच्या कर्मचार्यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक निधी परीक्षा अमरावती विभागाचे सहसंचालक यांनी एका पत्राद्वारे पालिका मुख्याधिकारी यांना दिले आहे. महाराष्ट्र राज्य युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्या तक्रारी वरून होऊ घातलेल्या सदर चौकशीनंतर पालिका प्रशासनाकडून होणार्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
येथील नगर पालिकेतील काही कर्मचार्यांनी नगर परिषद प्रशासनाला चुकीची माहिती देऊन शासनाकडून नियमबाह्य अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ घेण्याचा प्रकार घडला होता. प्रशासनाला लाखो रुपयांनी चुना लावणार्या सदर प्रकरणात सहभागी असलेल्या दोषी कर्मचार्यांवर कठोर प्रशासकीय कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी एका तक्रारीद्वारे केली होती. याबाबत सर्वप्रथम दैनिक ‘सकाळ’ ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून नगरपरिषद प्रशासन व लेखा परीक्षण विभाग यांचे लक्ष वेधले होते. सहावा वेतन आयोग अनुसार शिफारशी प्रमाणे कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांना अतिरिक्त वेतन वाढ लागू करण्यात येणार नाही असे स्पष्ट निर्देश असताना देऊळगाव राजा नगरपालिकेने या आदेशाचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली होती.
प्रशासनाची दिशाभूल करून पालिका कर्मचार्यांनी नियमबाह्य लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या पालिकेची लुबाडणूक केली. गंभीर स्वरूपाच्या या गैरप्रकाराविषयी विभागीय आयुक्त यांच्याकडे श्री. खरात यांनी तक्रार नोंदवून संबंधित कर्मचार्याकडून आगाऊ वेतनवाढी संदर्भात घेतलेल्या आर्थिक लाभाची रक्कम परत घेऊन दोषी कर्मचार्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली होती.
सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्थानिक निधी लेखा परीक्षा सहसंचालक अमरावती यांनी पालिका मुख्याधिकार्यांना एका पत्राद्वारे घडलेल्या प्रकरणा संदर्भात शहानिशा करून दोषी आढळणार्या कर्मचार्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. याबरोबरच बुलडाणा लेखा विभाग कार्यालयाकडून होणार्या नियमित लेखा परीक्षणाच्या वेळी सदर बाब त्यांच्या लक्षात आणून देण्याचे आदेशही सहसंचालक यांनी पालिका मुख्याधिकार्यांना दिले आहे. सदर तक्रारीची दखल घेत राज्य शासनाने चौकशीसाठी संबंधित कर्मचार्यांचे अभिलेखे संबंधित विभागास उपलब्ध करून देण्याचे सुचविले आहे