देशभरात फास्ट टॅगची अंमलबजावणी करून पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटविले जातील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली. टोलनाके हटविण्याच्या दृष्टीने जुन्या गाड्यांमध्ये मोफत जीपीएस यंत्रणा बसविली जाईल, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.
बसपाचे खासदार दानिश अली यांनी गढमुक्तेश्वर येथील टोलनाक्याचा प्र्रश्न उपस्थित केला होता. यावर मागील सरकारमध्ये रस्ते प्रकल्पांच्या कंत्राटामध्ये आणखी मलई टाकण्यासाठी शहराच्या सीमांवर असे अनेक टोलनाके बांधण्यात आल्याचा आरोप गडकरी यांनी केला. आता टोलनाके हटविण्यात आले तर रस्ते कंपन्या नुकसानभरपाई मागतील, मात्र सरकारने पुढील वर्षभरात सर्व टोलनाके संपुष्टात आणण्याची योजना तयार केली आहे, असे गडकरी म्हणाले.
आगामी काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने गाडी जेवढी रस्त्यावर चालणार, तितका टोल भरावा लागेल, असे सांगून ते पुढे म्हणाले की, टोलनाके संपुष्टात आणण्याच्या योजनेत तुम्ही महामार्गावर जिथून चढाल, तिथे जीपीएसच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरा तुमचा एक फोटो घेईल. तसेच महामार्गावर जिथे तुम्ही बाहेर पडाल, तिथेही एक फोटो घेतला जाईल. यावरुन तुम्ही जेवढा प्रवास केला असाल तितक्या अंतराचा टोल तुम्हाला भरावा लागेल. टोलनाक्यांमुळे सतत होणारी वाहतूक कोंडी तसेच प्रवाशांना होणारा त्रास हा गेल्या काही वर्षातला कळीचा मुद्दा बनलेला आहे. अलिकडेच केंद्र सरकारने फास्ट टॅगची योजना लागू केली होती. यामुळे रांगेत न राहता प्रवाशांना आपला टोल भरुन पुढे जाण्याची सोय प्राप्त झालेली आहे.