अकोला : थकीत वीज देयकासाठी अकोला जिल्ह्यातील ६४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या खांबोरा आणि घुसर पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरण तर्फे मंगळवारी खंडित करण्यात आला आहे.
महावितरण अकोला परिमंडलाच्यावतीने सर्व वर्गवारितील ग्राहकांकडील थकित देयके वसुलीसाठी मोहिम उघडण्यात आली आहे. खांबोरा पाणीपुरवठा योजनेकडे एक कोटी चार लाख १३ हजार व घुसर पाणीपुरवठा योजनेकडे ४८ लाख १२ हजार रुपयाची थकबाकी आहे. थकबाकी भरण्याबाबत संबंधित विभागाशी पाठपुरावा करण्यात आला.
पत्रव्यवहाराव्दारे वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु थकबाकी भरण्यासंदर्भात संबंधित विभागाकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजास्तव महावितरणला ही कारवाई करावी लागली असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील महान व अकोट पाणीपुरवठा योजनाही थकबाकीमुळे महावितरणच्या रडारवर असून, लवकरच त्यांच्यावरही कारवाई करण्याची प्रक्रीया पूर्ण होणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.
कृत्रिम पाणीटंंचाईचे संकट
महावितरणतर्फे पाणीपुरवठ्याच्या थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. परिणामी संपूर्ण जिल्ह्याला कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकट उभे आहे. मागील वर्षभराच्या सर्व वर्गवारीतील थकबाकीमुळे महावितरण आर्थिक संकटातून जात असल्याने वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आली आहे. महावितरणची कारवाई टाळण्यासाठी थकित देयकांचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.
महापालिकेकडून सवाकोटीचा भरणा
महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज जोडणीच्या देयकाची डिसेंबर २०२० अखेरपर्यंतची थकबाकी महानगरपालिकेतर्फे भरण्यात आली आहे. सुमारे एक कोटी २५ लाखांचा भरणा केल. मनपाने महावितरणकडे केला असल्याचे मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंतांनी सांगितले. याशिवाय आणखी सुमारे एक कोटीच्या जवळपास थकबाकी आहे. त्याचा भरणा करण्यासाठी शहरात पाणीपट्टी वसुलीसाठी नियोजन करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.
पाणीपट्टी वसुलीसाठी पथकांचे गठण
प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेअंतर्गत पाणीपट्टीची वसुली अल्प असल्याने वसुलीसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वसुली पथकांचे गठण केले आहे. एकूण वसुलीची रक्कम ४४ काेटी ४२ लाखांवर पाेहाेचली आहे. जिल्ह्यात ८४ आणि ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा यासारख्या प्रमुख याेजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येताे. या योजनांचे वीज देयक थकल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.