मुंबई – राज्यातील एमपीएससी परीक्षा मध्ये प्रचंड अनागोंदी, घोळ सुरू असून निवड झालेल्या अधिकारी कर्मचारी ह्यांना जाणीवपूर्वक नियुक्त्या दिल्या जात नाही. ह्या मनमानी तसेच गडबड घोटाळ्या विरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडीने एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला असून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय युवा आघाडी राज्य कार्यकरणीने आज घेतला आहे.
सलग पाच वेळ परीक्षा पुढे ढकलून राज्यातील लोकसेवा आयोगाने महाराष्ट्रात मोठा घोळ घालून ठेवला आहे.सोबतच ज्या उमेदवारानी पूर्व, मुख्य आणि मुलाखती मध्ये स्थान मिळविले आहे, असे अनेक विध्यार्थी नियुक्ती अभावी हताशपणे नियुक्ती कधी मिळणार ह्याची वाट पाहत आहेत.परीक्षा नियमात मनमानी बदल करणे, परीक्षा घेण्यासाठी नेमलेल्या आयटी कंपनी ची सदोष यंत्रणा, परीक्षा केंद्र तसेच परीक्षा निकालाचे संशयास्पद घोळ अश्या असंख्य घोटाळे सुरू आहेत.
ह्या विरुद्ध वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा ह्यांचे नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन उभारण्याचा निर्णय युवा प्रदेश कार्यकारणीने आज घेतला असून युवकांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या परीक्षा आणि नियुक्ती मधील घोळ संपवून लोकसेवा आयोगाला वठणीवर आणण्याचा निर्धार देखील करण्यात आले आहे, अशी माहिती महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे. आजच्या बैठकीला प्रदेश युवा पदाधिकारी एड सचिन जोरे, ऋषिकेश नांगरे पाटील, रविकांत राठोड, शमीभा पाटील, अक्षय बनसोडे, चेतन गांगुर्डे, सूचित गायकवाड, विशाल गवळी, विश्वजित कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.