देऊळगावराजा (बुलडाणा) : मुख्यमंत्री सौर शेती पंप योजनेअंतर्गत कामाच्या पूर्तता अहवालावर सह्या करण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताना महावितरण उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक अभियंता यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. सदर कारवाई स्थानिक वीज वितरण उपविभागीय कार्यालयात सोमवारी (ता.१५) सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली असून लाचेच्या रकमेसह संबंधित सहाय्यक अभियंता यास ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी येथील कंत्राटदार असलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीने बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी (ता.१५) सापळा रचण्यात आला. तक्रारदार हे महावितरण कंपनीचे कंत्राटदार असून त्यांना मुख्यमंत्री सौर शेती पंप योजना अंतर्गत केलेल्या कामाच्या पूर्तता अहवालावर सही करण्याचा मोबदला म्हणून प्रती अहवाल पाचशे रुपये प्रमाणे पंधराशे रुपयांची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात सापळा रचून सहाय्यक अभियंता योगेश उदयसिंह भोकन (वय २८) यांना पंधराशे रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. लाचेची रक्कम जप्त केली.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलिस नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, जगदीश पवार, चालक मधुकर रगड यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय कामासाठी अथवा काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा टोल फी क्रमांक १०६४ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.