अकोला : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड शेतशिवारात एका १७ वर्षीय युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह (ता. १३) मार्च रोजी सकाळी आढळून आला. युवतीने जाळून घेत आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला तरी बोरगाव मंजू पोलिसांनी हा घातपात तर नव्हे ना या दिशेने तपास सुरू केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाची दिशा निश्चित होईल.
बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व अकोला शहरापासून जवळच असलेल्या यावलखेड शेतशिवारात शनिवारी सकाळी युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. या घटनेची माहिती होताच सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनसह बोरगाव मंजू व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक घटना स्थळावर पोहोचले. मूर्तिजापूरचे पोलिस उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, ठाणेदार सुनील सोळंके, गुन्हे अन्वेषण विभाग पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ, ठसे तज्ज्ञांसह बोरगाव मंजू पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या युवतीचे नाव समीक्षा श्रीकृष्ण देवर असल्याची माहिती आहे. घटनास्थळी सायकल, एक बॅग व मृत्यू पूर्वी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी आढळून आली. पोलिसांनी पोलिस दफ्तरी नोंद करून पुढील अधिक तपास ठाणेदार सुनील सोळंके करत आहेत.
आई-वडिलांची माफी मागितल्याची चिठ्ठी आढळली
अर्धवट जळालेल्या मृतदेहाजवळ सापडलेल्या बॅगेत रजिस्टरच्या पानावर लिहिलेला मचकूर आढळून आला. त्यात आई-वडिलांचे माफी मागत आत्महत्या करीत असल्याचे नमूद केलं आहे. तिचे वडिल निंबी मालोकार येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिचे आई-वडील दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी अकोला येथे डाबकी रोड परिसरात राहत आहेत. युवतीचे वडील ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून मुलांना शिकवत आहेत.