बेमेतरा : एका युवक आणि युवतीने नदीत उडी मारल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दोघांनी नदीत उडी मारण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर स्टेटसला ‘आई-बाबा मला माफ करा’ असं लिहिलं आहे. यानंतर दोघांनी एकत्रितपणे नदीत उडी मारली आहे. पण त्याचवेळी संबंधित पुलावरून जाणाऱ्या आयटीआयच्या काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी या दोघांनाही वाचवलं आहे. त्यानंतर त्यांनी 108 वर फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यासंबंधित माहिती देताना बेमतरा पोलीस स्थानकाचे प्रभारी राजेश मिश्रा यांनी सांगितलं की, बेमेतराच्या अमोरा पुलावर घटनास्थळी असलेल्या काही जणांनी अशी माहिती दिली आहे की, दोन लोकांनी नदीत उडी मारली आहे. त्यानंतर ते पोलीस दलासह तातडीने घटनास्थळी पोहचले आणि आत्महत्या करणाऱ्या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती सामान्य झाल्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल. त्यानंतरचं आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
नदीत उडी मारण्यापूर्वी संबंधित तरुण-तरुणीने त्यांच्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस टाकला होता की, ‘आई-बाबा मला माफ करा, आयुष्यापासून हारलो आहे.’ यानंतर, त्यांनी नदीत उडी मारली, पण तेथून जाणाऱ्या काही लोकांनी दोघांचे प्राण वाचवले आहेत. खरंतर गेल्या काही काळापासून शिवनाथ नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. महिन्याभरापूर्वीच येथून एका अल्पवयीन मुलीने उडी घेऊन आत्महत्या केली होती. पोलीस अद्याप या घटनेचा तपास करत आहेत. यावेळी पुन्हा दोघांनी एकत्रित नदीत उडी मारल्याची घटना समोर आली. सुदैवाने तेथून जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्यांचे प्राण वाचवले. अन्यथा या दोघांनाही आपला जीव गमवावा लागला असता.
जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये झाली वाढ
बेमेतरा जिल्ह्यात तरूण, मुली, वृद्ध आणि अल्पवयीन मुलं आत्महत्या करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. गेल्या 2 महिन्यांत 50 हून अधिक लोकांनी फाशी घेऊन, पाण्यात उडी घेऊन, स्वतः ला पेटवून आत्महत्या केली आहे. तर या जिल्ह्यात एकाच वर्षात तब्बल 250 हून अधिक लोकांनी आपला जीव दिला आहे.