अकोला(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत जनजागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने रांगोळी स्पर्धा, शॉर्टफिल्म /डॉक्युमेंटरी फिल्म आयोजित स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कृत करण्याकरिता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला दिनाचे औचित्य साधून स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले त्या वेळी जिल्हा परिषद अकोला चे अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांनी महिला याच खऱ्या अर्थाने समाजाची शक्ती आहेत, महिलांचे सक्षमीकरण करणे ही काळाची गरज असून स्त्रीशक्तीचा गौरव करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आरोग्य विभाग व महिला बाल कल्याण विभागाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात अविरत काम करणाऱ्या आशांचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी महिलांना सन्मान करण्याकरिता अत्यंत अल्प कालावधीत स्पर्धांचे आयोजन करण्या करिता विभागांना प्रोत्साहित केले. महिलांमध्ये अनेक सुप्त गुण असतात त्यांना वाव देण्याकरिता आपण सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले त्याचप्रमाणे विजेत्यांचे कौतुक केले. शॉर्ट फिल्म स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्यांच्या शॉर्ट फिल्म प्रसारित करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.
यावेळी सन 2019-20 च्या सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गट प्रवर्तक पुरस्कार व आरोग्य सखी पुरस्कारांचे सुद्धा वितरण करण्यात आले. श्रीमती वंदना तेलगोटे, श्रीमती उमा इसयकार, श्रीमती कविता मनवर यांना जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार श्रीमती रेखा डोंगरे, द्वितीय पुरस्कार कु. शीला जुनगरे, तृतीय पुरस्कार वयाने सर्वात लहान असलेल्या कु.वेदांतिका सुरज गोहाड, तर प्रोत्साहनपर पुरस्कार गीता मनीष उनवणे यांना देण्यात आला.
सदर पुरस्कार समारंभ जिल्हा परिषद उपाध्यक्षा सावित्रीबाई राठोड, जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई इंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुभाष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) वैशाली ढग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश असोले, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विलास मरसाळे या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आशा समन्वयक सचिन उनवणे तर आभार प्रदर्शन जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी केले.