बुलढाणा : महिलांवरील छळाच्या बातम्या समोर येत असताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावमध्ये सासू-सासऱ्यांनी आपल्या सुनेचं कन्यादान केलं आहे. या घटनेतून दोन्ही दाम्पत्याने नवा आदर्श उभा केला आहे.
सुनगावमधील शालिग्राम वानखडे आणि वत्सलाबाई यांनी आपल्या सुनेचं कन्यादान करुन एक आदर्श निर्माण केला आहे. सुनगावमधील संतोष शालिग्राम वानखडे या तरुणाचा 16 मार्च 2020 मध्ये धामणगाव तालुका संग्रामपूर येथील राधा उमाळे या तरुणीसोबत विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या काही महिन्यातच (31 ऑगस्ट 2020) संतोष शालिग्राम वानखडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर राधा आपल्या सासरीचं राहत होती.
पुढील सात ते आठ महिने सासरे शालिग्राम आणि सासू वत्सलाबाई यांनी राधाचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ केला. इतकच नाही तर त्यांनी सुनेच्या विवाहासाठीही प्रयत्न सुरू केले. एक चांगला मुलगा पाहून 6 मार्च रोजी खेरडा येथील प्रशांत राजनकार याच्यासोबत सुनगाव येथे नोंदणी पद्धतीने विवाह करून दिला. त्यामुळे गावभरात वानखडे दाम्पत्यांचं कौतुक केलं जात आहे. या विवाहासाठी राधाचे सासू-सासरे अनेक महिन्यांपासून प्रयत्न करीत होते. अखेर त्यांनी आपल्या सुनेसाठी चांगला वर शोधून तिचं लग्न लावून दिलं. कोरोनाचे निर्बंध असल्याने छोटेखानी नोंदणी पद्धतीचा विवाह सुनगाव येथे पार पडला.
सुनेच्या आनंदासाठी सासू-सासरे आपल्या मुलाच्या मृत्यूचे दु:ख विसरले. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ही सकारात्मक बातमी समोर आली आहे. ऐरवी महिलाच महिलांच्या शत्रू असतात असं म्हणणाऱ्यांसाठी हे एक चांगलं उदाहरण आहे.