अहमदनगर : राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात श्रद्धास्थान असलेल्या साईंबाबाच्या शिर्डीत येणाऱ्या भाविकांना प्रवेश कर लावण्याचा ठराव शिर्डी नगरपंचायतमध्ये मांडण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या मुद्यावरून राजकीय वाद रंगला आहे.
साईबाबा संस्थानकडून शिर्डी नगरपंचायतला स्वच्छता निधी दिला जात होता. तथापि हा निधी आता संस्थानने देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी पुन्हा एकदा प्रवेश कर लादला जाणार आहे. याबाबत सत्ताधारी भाजपकडून ठराव मांडण्यात आला आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात.
यापूर्वी, शिर्डीत येणाऱ्या भक्तांना प्रवेशकर द्यावा लागत होता. मात्र २००५ मध्ये शिर्डीच्या स्वच्छतेसाठी नगरपंचायतीला साई संस्थानकडून निधी दिला जात होता. तत्कालीन अध्यक्ष जयंत ससाणे यांनी हा निर्णय घेतला होता. या निर्णयान्वये महिन्याला साई संस्थानकडून नगरपंचायतला ४२ लाख रुपये मिळत होते. मागील आठ महिन्यांपासून हा निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.