उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनचा साठा असलेली कार आढळून आल्याच्या प्रकरणाला शुक्रवारी वेगळे वळण मिळाले. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा साक्षीदार असलेले मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी दुपारी मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकरणावरून विरोधकांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरले. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत. पाच वर्षे गृहमंत्री सांभाळलेल्या फडणवीसांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा, असे प्रत्युत्तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. रात्री उशिरा या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवत असल्याचे गृहमंत्र्यांनी जाहीर केले.
दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात मुकेश अंबानी यांचा अँटिलिया बंगला असून, तेथून अवघ्या 600 मीटर अंतरावर 25 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच किलो जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचे आढळून आले होते. ही गाडी ठाण्यातील रहिवासी मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट होताच हिरेन यांनी स्वतःच पुढे येत आपली गाडी चोरीला गेल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली होती. आपला जबाबही त्यांनी नोंदवला होता. या स्फोटक स्कॉर्पिओप्रकरणी महत्त्वाचे साक्षीदार असलेले हिरेन यांचाच संशयास्पद मृत्यू झाल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
संशयास्पद मृत्यू
मनसुख हिरेन यांचा गाडी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी रात्री 8च्या सुमारास हिरेन घरी असताना त्यांना एक फोन कॉल आला होता. त्यानंतर ते घराबाहेर पडले. मात्र, रात्री ते घरी परतलेच नाहीत अशी तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलिसात शुक्रवारी सकाळी दाखल केली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळून आला. हिरेन यांचा मृतदेह दिवा खाडीकडून मुंब्राकडे वाहत आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. तर हिरेन यांच्या चेहर्यावर मास्क होता. या मास्कच्या खालीदेखील रुमाल बांधलेले होते. हिरेन यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत मुंब्रा पोलीस व गुन्हे शाखेचे पथक तपास करीत आहेत असे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.
विधानसभेत पडसाद
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 293 अन्वये उपस्थित केलेल्या कायदा व सुव्यवस्था या चर्चेदरम्यान मनसुख यांच्या मृत्यूचे तीव्र पडसाद उमटले. मनसुुख यांच्या संशयास्पद मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित करीत फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मृतदेह बाहेर काढला असता हिरेन यांचे हातपाय बांधलेले होते, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. मात्र हा तपशील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळला. हिरेन यांचे हातपाय बांधलेले नव्हते. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. पोस्टमॉर्टममध्ये या सर्व बाबी समोर येतीलच असे देशमुख म्हणाले. त्यावर तीव्र आक्षेप घेत फडणवीस म्हणाले, गृहमंत्री थातूर-मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहेत. पोलीस स्टेटमेंट आणि गृहमंत्र्यांच्या माहितीत विसंगती आहे. मनसुख हिरेन या प्रकरणाचा महत्त्वाचा दुवा होते. त्यांना वाचविण्यात पोलीस अपशयी ठरले. या प्रकरणात सरकार कोणाला वाचविण्याचा प्रयत्न आहे काय? असा सवाल त्यांनी केला आणि फडणवीस- गृहमंत्री आमने- सामने आल्याचे चित्र निर्माण झाले.
हिरेन यांचा गाड्या दुरुस्तीचा व्यवसाय होता. त्यांच्याकडे एका व्यक्तीने इंटिरिअर दुरुस्तीसाठी गाडी टाकली होती. मात्र, दीड लाख रुपयांचे बिल देऊ न शकल्याने हिरेन यांच्याकडेच 2018 पासून गाडी होती. मुंबई पोलीस याचा तपास करत आहेत. याप्रकरणी विरोधकांकडे आणखी काही माहिती, पुरावे असतील तर द्यावेत. महाराष्ट्र व मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत, अशा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांना सुनावले.