हिवरखेड(धीरज बजाज)- विधानपरिषदेत पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोलदादा मिटकरी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील विविध विषयांवर लक्ष केंद्रित करीत जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मागण्या प्रस्तावित केल्या आहेत. व या पूर्ण करण्याची विनंती करीत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
विदर्भातील सर्वात मोठी असलेल्या हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायत अथवा नगरपरिषद मध्ये रुपांतर करण्याची तात्काळ अधिकृत घोषणा व्हावी अशी मागणी करीत आवाज बुलंद केला. मिटकरी यांनी हिवरखेड चा मुद्दा अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने दुसऱ्यांदा मांडला आहे. विधिमंडळाच्या रेकॉर्डवर आलेला हिवरखेड नगरपंचायतचा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण हा मुद्दा हिवाळी अधिवेशनानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा गाजला आहे. या मागणीवर दि 8 मार्च रोजी संबंधित मंत्री महोदय विधिमंडळात उत्तर देण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे.
मागील 20 वर्षांपासून हिवरखेड वासीयांची सातत्याने नगरपंचायत साठी सामूहिक मागणी सुरू असून आतापर्यंत शासनाचे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, हिवरखेड विकास मंच, लोकजागर मंच, सामाजिक कार्यकर्ते, सक्रिय पत्रकार बांधव, जागरूक नागरिक, ग्रामपंचायत आणि अनेक व्यक्ती संघटना संस्था इत्यादी या विषयासाठी निरंतर संघर्ष करीत आहेत.
संतोष बजाज यांच्या येथे भेटी दरम्यान तत्कालीन सरपंच सौ अरुणताई ओंकारे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी भिमराव गरकल, सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, माजी सरपंच संदीप इंगळे, राहुल गिर्हे, अर्जुन खिरोडकार, सूरज चौबे, जितेश कारिया, राजेश पांडव, उमर बेग मिर्झा, अनिल कवळकार, जावेद खान, महेंद्र कराळे, सुरेश ओंकारे, इत्यादी सर्व उपस्थितांनी आमदार अमोल मिटकरी यांना याविषयी साकडे घातल्यानंतर आमदार अमोल मिटकरींनी हिवरखेड निर्मिती हा 40000 नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून नगरपंचायत करण्याचे वचन सर्वांना दिले होते. दिलेले शब्द पाळत आमदार मिटकरींनी दुसऱ्यांदा विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज बुलंद केला.
प्रस्ताव पूर्ततेसाठी, शासकीय स्तरावर ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरविकास मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालय, इत्यादी सर्व महत्वपूर्ण कार्यालयाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचे अमूल्य सहकार्य मिळाले.
हिवरखेड नगरपंचायत सोबतच आ. अमोलदादा मिटकरींनी कुटासा, दहीहांडा नवीन पोलीस स्टेशन निर्मिती, पोलीस वाहन चालकांना पदोन्नती का देण्यात आली नाही, अकोट उपजिल्हा रुग्णालयाबाबतचा विषय घेत अकोट उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटाचे काम त्वरित सुरू करावे, सर्व आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका द्याव्यात, चोहट्टा बाजार येथे ग्रामीण रुग्णालय द्यावे, बर्ड फ्लू संदर्भात मदत करावी, अकोला शासकीय दूध योजना सुरू करावी अशा अनेक मागण्या रेटून धरल्या.
प्रतिक्रिया
हिवरखेड नगरपंचायत बाबतीत मी विधिमंडळात पुन्हा मागणी केली असून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याचा विश्वास आहे
अमोलदादा मिटकरी, आमदार, विधानपरिषद.
आ. अमोलदादा मिटकरी यांनी विधिमंडळात पुन्हा आवाज बुलंद केल्याने हिवरखेड नगरपंचायत साठी प्रयत्न करणाऱ्यांसह चाळीस हजार लोकांचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
धिरज बजाज सामाजिक कार्यकर्ते हिवरखेड.