मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावे लागलेले संजय राठोड यांचा राजीनामा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे.संजय राठोड यांनी २८ फेब्रुवारीला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला होता.या प्रकरणी विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याने आज राज्यपालांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा विरोधकांनी दिल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत राठोडांच्या राजीनाम्यावर पुढे काय असा सवाल पत्रकारांनी केली होता.त्यावर त्यांचा राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतला नाही.असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिले होते. मात्र राठोड यांना राजीनामा देवून चार दिवस उलटले असतानाही त्यांचा राजीनामा मंजूर केला नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते.भाजपचे आमदार संजय कुटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करीत,राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का ? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का ? असा खोचक सवाल केला होता.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून संजय राठोड यांचा राजीनामा राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आल्यानंतर राज्यपालांनी तो मंजूर केला आहे.महाविकास आघाडीत राठोडांच्या राजीनाम्यामुळे एक मंत्रीपद रिक्त असल्याने आता हे वनमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून लॅाबींगला सुरूवात झाली आहे.त्यामुळे वने वनमंत्रीपद कोकणाकडे की विदर्भाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.