उस्मानाबाद : जिल्ह्यातील वाकरवाडीच्या शकुंतला विठ्ठल शिंदे यांचं अडीच ग्रामचं सोन्याचं मंगळसूत्र 22 वर्षांपूर्वी कळंबमधील येडेश्वरी देवीच्या यात्रेत चोरीला गेलं होतं. चोरट्यांनी हे सोनं लंपास केलं तेव्हा शकुंतलाबाईंचं वय 40 वर्ष होतं. आता तब्बल 22 वर्षांनी त्यांना त्यांचे हे दागिने परत मिळाले आहेत. आता वयाच्या 62 व्या वर्षी 2 मार्चला कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी शकुंतलाबाईंचे हे दागिने परत केले आहेत. इतक्या वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आपले दागिने परत मिळाल्यानं त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबादच्या वाकरवाडी येथील शकुंतला शिंदे या शेती पिकवून तसंच मजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत. 22 वर्षापूर्वी म्हणजेच 1998 मध्ये शकुंतलाबाई आणि पती विठ्ठल कळंब तालुक्यातील येडेश्वरी देवीच्या यात्रेत गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील अडीच ग्राम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र लंपास केलं. त्यावेळी येरमळा येथे पोलीस ऑउटपोस्ट होते. शकुंतलाबाई यांनी रीतसर तक्रार दिली. तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्यानी वर्षभरात चोरी प्रकरणातील गुन्ह्याचा तपास लावला होता. दरम्यानच्या काळात शकुंतलाबाई यांनी दोन वेळेस पोलीस ठाण्याकडे मंगळसूत्र सापडले का, याची माहिती घेण्यासाठी चकरा मारल्या. मात्र, तपास अधिकारी बदलून गेले. त्यामुळे तपासात उघडकीस आलेले सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यातच जमा राहिले.
पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयात सुनावण्या होत गेल्या. न्यायालयीन प्रक्रियेत मंगळसूत्र अडकून पडले असून चोरट्याला शिक्षा झाली नाही. अखेर 1998 मध्ये चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्याचा तपास २०१० मध्ये लागला. 13cजुलै 2019 मध्ये शकुंतलाबाई शिंदे यांच्या दागिन्यांचे प्रकरण न्यायालयीन सुनावणीस आलं. त्यानंतर येथील न्यायालयात लोकअदालत झाली. लोकअदालतने शकुंतलाबाई यांना अडीच ग्राम वजनाचे मंगळसूत्र परत करण्याचे आदेश पोलिसांना दिले. न्यायालयाचा आदेश असल्यामुळे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी स्वतः लक्ष घालून फिर्यादी महिला सध्या कुठे राहते. चोरीस गेलेले मंगळसूत्र शकुंतलाबाई यांचेच आहे का याबाबतची चौकशी करून उस्मानाबाद तालुक्यातील वाकरवाडी येथील या महिलेस पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन मंगळसूत्र परत केले.
१९९८ ला चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र पळविले त्यावेळचे सोन्याचे दर अंदाजे 1 हजार 800 रुपये प्रतितोळा असावेत. त्यावेळी त्यांचे वय ४० होते. चोरीस गेलेले मंगळसूत्र तब्बल २२ वर्षांनी म्हणजे वयाच्या 62 व्या वर्षी परत मिळाल्यानं मंगळसूत्र मिळताच शकुंतलाबाईचे डोळे पाणावले.