नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून येत्या २७ जून रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे. जे विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा देऊ इच्छितात, त्यांनी अर्ज करण्यापूर्वी पूर्वपरीक्षा २०२१ साठी देण्यात आलेल्या सूचना यूपीएससीच्या संकेतस्थळावर जाऊन व्यवस्थित पाहाव्यात, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.
पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. कोरोना संकट आणि लॉकडाउनमुळे गतवर्षी उशिराने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा झाल्या होत्या. तर याच कारणांमुळे असंख्य विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले होते.