मुंबई : मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या 400 कोटी रुपयांच्या खर्चास रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टप्पा- 1 व 2 स्वरूपात काम हाती घेण्याबाबत निश्चिती करून काम हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. टप्पा-1 मध्ये 250 तर टप्पा-2 मध्ये 150 कोटी रुपये असे 400 कोटी अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा 1 मध्ये सर्व इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असून, यामध्ये स्थापत्य, विद्युत, इमारतीच्या अंतर्गत व बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामांचा समावेश आहे.
टप्पा-2 मध्ये तंत्रज्ञान, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे. चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी इत्यादी कामे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना हाती घ्यावयाचे प्रस्तावित आहे. 400 कोटी रकमेचा खर्च सुरुवातीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.
प्रशासकांना मुदतवाढ
कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांना 30 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणूका घेणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासकांना मुदतवाढ देण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार सरकारने प्रशासकांना मुदतवाढ दिली.
मत्स्य विद्यापीठातील शिक्षकांना सातवा आयोग
पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयांतील शिक्षकांना 1 जानेवारी 2016 कालावधीपासून सातवा वेतन आयोग लागू. याचा 388 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना लाभ होईल. यासाठी 30 कोटी रुपये एवढा निधी देण्यात येईल.
नांदेडमध्ये नर्सिंग कॉलेज
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 50 विद्यार्थी क्षमता असलेल्या शासकीय परिचर्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 16 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.
बालसंगोपन योजनेच्या अनुदानात वाढ
बालसंगोपन योजनेअंतर्गत बालकांचे संगोपन करणार्या पालकांना प्रति बालक दरमहा देण्यात येणार्या अनुदानात 425 वरून 1100 रुपये इतकी वाढ करण्यास आली आहे.