नवी दिल्ली : देशभरात कोरोना लसीकरणाचा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी एम्स रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे प्रत्यक्ष लस घेतानाचा फोटो शेअर करून दिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला उद्देशून सांगितले की, “देशतील नागरिकांनी न घाबरता कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी”, असे आवाहन त्यांनी नागरिकांनी केले आहे. मोदींनी भारत बायोटेकनिर्मित ‘कोवॅक्सीन’ ही लस टोचून घेतलेली आहे.
संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये ही लस मोफत उपलब्ध आहे. खासगी रुग्णलयांमध्ये २५० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यात १५० ही प्रत्यक्ष लसीची किंमत राहील, तर १०० रुपये सेवाशुल्क असणार आहे. देशामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला १६ जानेवारीला सुरुवात झाली होती. प्रथम फक्त कोरोना योद्ध्यांना ही लस देण्यात आली. आता ती प्रथमच सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, या टप्प्यात आजपासून ६० वर्षांवरील सर्वांना आणि ४५ ते ६९ वयोगटातील फक्त व्याधीग्रस्तांना लस उपलब्ध असणार आहे.
मागील वर्षभरात हृदयविकाराने दाखल व्यक्ती, कोणतीही हृदय शस्त्रक्रिया, हृदय प्रत्यारोपण, हृदयाच्या झडपांचा आजार, मधुमेह असलेली व्यक्ती, श्वसनाचा आजार असलेली व्यक्ती असे आजार असलेले ४५ ते ६० या वयोगटातील लोकांना आणि ६० वयाच्या पुढे असणाऱ्या वृद्धांना ही लस देण्यात येणार आहे.