मुंबई : जगभरातील भांडवली बाजारातील पडझडीचे पडसाद आज शेअर बाजारावर उमटले. आज शुक्रवारी सकाळी सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी कोसळला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०० अंकांनी आपटला. अवघ्या तीस मिनिटांत झालेल्या पडझडीने बाजारात जवळपास दीड लाख कोटींचा चुराडा झाला.सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५०० अंकांनी कोसळला आहे. तो ४९५४१ अंकांवर आहे. तर निफ्टी ४११ अंकांच्या घसरणीसह १४६७० अंकावर ट्रेड करत आहे.
अमेरिकेत महागाईचा आगडोंब उसळला आहे. भविष्यात महागाई आणखी वाढेल या भीतीने गुरुवारी गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. यामुळे अमेरिकेतील सर्वच भांडवली बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. त्याचे पडसाद आज शुक्रवारी आशियात उमटले. सिंगापूर, जपान, हाँगकाँग या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. भारतीय बाजार सुरु होताच गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला
अमेरिकेतील घडामोडी गुंतवणूकदारांच्या मनावर परिणाम करून गेल्या. त्यामुळे बाजारात मोठी उलथापालथ दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर बाजार विश्लेषक व्ही.के विजयकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की शेअर निर्देशांकाची स्थिती दोलायमान झाली आहे. आजच्या घसरणीमुळे चांगले शेअर कमी किमतीत खरेदी करण्याची गुंतवणूकदारांना संधी असल्याचे विजयकुमार यांनी सांगितले.
आजच्या सत्रात जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांवर दबाव आहे. सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २३ शेअर घसरले आहेत. ज्यात रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज ऑटो, इन्फोसिस, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.
चलन बाजारात डॉलरसमोर रुपयाची होरपळ झाली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेतल्याने डॉलरची मागणी वाढली आहे. परिणामी रुपयात तब्बल ६७ पैशांचे अवमूल्यन झाले आहे. रुपया सध्या ७३.१० वर आहे. केंद्र सरकारकडून तिसऱ्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. यात विकासदर वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. मात्र त्याआधीच बाजारात नफेखोरांनी नफावसुली सुरु केल्याचे बोलले जाते.