हिवरखेड (धीरज बजाज)- माजी सरपंच आणि सचिव यांनी केलेली 55 लाखापेक्षा जास्त रुपये अफरातफर चौकशीत सिद्ध झाल्यामुळे हिवरखेड ग्रामपंचायतची प्रतिमा मलीन होत असल्याने शासनाने आता हिवरखेड येथे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, उच्च शिक्षित, ग्राम विकास अधिकारी हवा अशी मागणी हिवरखेड विकास मंच आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेड यांच्याकडून केल्या जात आहे.
हिवरखेड ग्रामपंचायतची मागील अनेक वर्षांची पार्श्वभूमी पहिली तर विविध प्रकरणांमध्ये तक्रारी, अपील, विविध सदस्य आणि सरपंच पात्र अपात्र चे प्रकार सुरूच राहिले व अनेक वर्षे कोर्ट कचेरीतच गेले. एव्हढेच नव्हे तर लाखो रुपयांचा अपहार सिद्ध झाल्याने सचिव भिमराव गरकल आणि दोन माजी महिला सरपंच सौ शिल्पाताई मिलिंद भोपळे, सौ अरुणाताई सुरेश ओंकारे ह्या तिघांवर फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल झालेत. पाच वर्षात अनेक विकासकामे खोळंबली. हिवरखेड ही फक्त अकोला जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाते. येथे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांसाठी जवळपास तीन कोटी रुपयांच्या वर विकास निधी पडून असल्याची विश्वसनीय माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे.
ग्रामविकास अधिकारी हा ग्रामपंचायतीच्या पाठीचा कणा असल्यामुळे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, उच्च शिक्षित ग्रामविकास अधिकारी मिळणे आवश्यक आहे. विकास निधीवर डोळा ठेवून आपले हेतू साध्य करण्यासाठी काही मुरलेल्या तत्वांकडून भ्रष्टाचाराला वाव देऊन आपल्या सोईची अथवा स्वतःच्या स्वार्थासाठी अपेक्षित असणारी कामे करणारा ग्रामसेवक आणण्याचे प्रयत्न सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध योजनांचे जवळपास तीन कोटींचा निधी ग्राम पंचायतच्या विविध खात्यात जमा असून अनेक विकास कामे झाली असून अनेक कामांची देयके काढणे बाकी असल्याचे बोलले जात आहे. मागील अनुभव कटू असल्याने आता देयके काढताना काही अनियमितता होऊ नये याची दक्षता घेणे सुद्धा गरजेचे आहे.
अधिकाऱ्यांविनाच पार पडली मासिक सभा
ग्रामपंचायतीच्या कामकाजात ग्रामसभेसोबतच दर महिन्याच्या शेवटी पार पडणारी मासिक सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांची ही पहिलीच मासिक सभा असल्याने आणि 17 पैकी 15 सदस्य प्रथमच निवडून आल्याने या सभेची सर्वांनाच उत्सुकता होती. गुन्हे दाखल असल्यामुळे अटक होण्याच्या भीतीने 23 फेब्रुवारीला पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी भिमराव गरकल फिरकलेच नाहीत. पर्यायी व्यवस्था म्हणून विस्तार अधिकारी अथवा इतर कोणतेही वरिष्ठ अधिकारी सुद्धा मासिक सभेला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे नवनियुक्त सरपंचांना पहिलीच मासिक सभा अधिकाऱ्यांविनाच घ्यावी लागली. यावेळी सर्वच सदस्यांनी मासिक सभेत विविध प्रश्नांची सरबत्ती केली आणि सभा गाजविली. आता सर्व सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर समाधान करू शकणारा ग्रामविकास अधिकारी मिळणे अपेक्षित आहे.